पिंपरी : शहरातील विविध विकासकामांची उद्घाटने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाली. ई-उद्घाटन सोहळ्यास महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या गटनेत्यांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी विनंती करूनही त्यांना कार्यक्रमात बोलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवारी झाला. त्या वेळी व्यासपीठावर फक्त भाजपाचेच पदाधिकारी होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, महापालिकेतील विरोधीपक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांच्यासह विरोधीपक्षातील नगरसेवक अनुपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडकरांच्यावतीने भाजपाचेआमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी कार्यक्रमात प्रश्न मांडले. त्यानंतर शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांना मला दोन मिनिटे बोलण्याची संधी द्या, अशी विनंती केली. त्यावर ‘पुण्यात कार्यक्रमाला जायला उशीर झाला आहे. आपले म्हणने मला सांगा, मी भाषणात आपल्या प्रश्नावर बोलतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर परवानगी न मिळाल्याने चाबुकस्वार आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणात चाबुकस्वारांचा उल्लेख करून, शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देणे आणि एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.
विरोधी पक्षनेत्यांचा कार्यक्रमांवर बहिष्कार
महापालिकेचा कार्यक्रम न करता भाजपा पक्षाचा अजेंडा राबवित आहेत. विरोधीपक्षातील सदस्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, म्हणून विरोधीपक्षनेते दत्त्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनीही अनुपस्थित राहून बहिष्कार टाकला.