पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष घातले होते. मात्र, महापालिकेत सत्ता आल्यानंतर शहरातील प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका विरोधक करीत होते. मात्र, येत्या १२ आॅगस्टला पिंपरी-चिंचवड शहरातीलविविध प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत ते संवाद साधणार प्रश्नांवर तोडगा काढण्याची शक्यता आहे.महापालिकेत फेब्रुवारी २०१७ पर्यंत राष्टÑवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. महापालिका निवडणुकीच्या अडीच वर्षे अगोदरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील राजकारणात लक्ष घातले होते. पक्ष अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. तसेच आमदार महेश लांडगे यांना सहयोगी सदस्य करून घेतले होते. तसेच माजी महापौर आझम पानसरे यांना पक्षात घेतले होते.राष्टÑवादी काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठीची रणनीती त्यांनी आखली होती. त्याचबरोबर शहरातील प्रश्नांबाबत लक्ष घातले होते. महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र सभाही दिल्या होत्या.महापालिकेतील भाजपाच्या विजयानंतर स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये समेट घडविणे, समन्वय ठेवणे, जुन्या नव्यांचा मेळ साधण्याबरोबरच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेते निवडीपासून स्वीकृत सदस्य निवडीतही लक्ष घातले होते.दिलेल्या शब्दानुसार कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच येणार आहेत. या वेळी शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांची उद्घाटने करण्याबरोबरच दिवसभराचा वेळ शहरासाठी दिला आहे, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:46 AM