पिंपरी : राष्ट्रवादीच्याच शिलेदारांची फोडाफोडी करून सत्ता हस्तगत करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, तर स्वबळावर लढण्याचा नारा देत शिवसेनेने पायावर धोंडा पाडून घेतल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसला खातेही खोलता आले नाही. प्रमुख राजकीय पक्षाविरुद्ध बंड करून अपक्षांनी आपली ताकत दाखवून दिली आहे.महापालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये १२८ जागांसाठी निवडणूक झाली. रवी लांडगे यांच्या माध्यमातून भाजपाने बिनविरोध खाते खोलल्याने उर्वरित १२७ जागांसाठी मतदान झाले. शहरातील ११ लाख ९२ हजार ८९ मतदारांपैकी ६५.३५ टक्के म्हणजेच ६ लाख ७९ हजार ६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ३ लाख ५८ हजार ५०६ महिला, तर ४ लाख २० हजार ५४७ पुरुष मतदारांचा समावेश होता. शहरातील ११ मतमोजणी केंद्रांवर आज सकाळी दहाला सुरुवात झाली. चोख बंदोबस्तात शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. सर्वांत आधी प्रभाग क्रमांक ३, चऱ्होली मोशीचा निकाल हाती आला. या ठिकाणी भाजपाने तीन जागा पटकावित विजयी पताका फडकावली. राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. येथूनच शहरातील एकूण लढतीचे चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली. खरा सामना भाजपा आणि राष्ट्रवादीमध्येच झाला. या लढाईत शिवसेना मागे फेकली गेली. कॉँग्रेसचे नामोनिशाण दिसेनासे झाले. सचिन चिखले यांच्या माध्यमातून एकमेव जागा पटकावित मनसेचे नाक राखले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची कुशल व स्वच्छ प्रतिमा आणि भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांचा या यशात मोलाचा वाटा असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी कॉँग्रेसने २० वर्षांत शहराच्या विकासापेक्षा त्यांचा भ्रष्ट कारभार व गैरव्यवहाराचीच अधिक चर्चा झाली. त्यामुळे जनता पर्याय शोधत होती. केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही परिवर्तनाची अपेक्षा शहरवासीयांना होती.
मुख्यमंत्री नीती यशस्वी
By admin | Published: February 24, 2017 3:00 AM