पिंपरी : चिखली परिसरातील ताम्हाणे वस्ती येथील साडेतीन वर्षीय मुलीचे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अपहरण झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जुन्नर येथून अपहरणकर्त्याला दहा तासांत ताब्यात घेतले. हे प्रकरण ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे मुलीच्या अपहरणाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
विमल संतोष चौगुले (वय २८, रा.महादेवनगर, जुन्नर), संतोष मनोहर चौगुले (वय ४१, रा.जुन्नर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना साथ देणाऱ्या सुनीता अशोक नलावडे (वय ४०, ताम्हाणे वस्ती, चिखली), अंकिता अशोक नलावडे (वय २२, ताम्हाणे वस्ती, चिखली), निकिता अशोक नलावडे (वय १८, रा.ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनाही अटक केली आहे, तसेच एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तारा राजा शेख (वय ३०) यांनी पोलिसांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या शेजारी आरोपी सुनीता नलावडे राहतात. आठ दिवसांपूर्वी सुनीताची बहीण आरोपी विमल ही तिच्याकडे तिच्या १२ वर्षीय मुलासोबत राहण्यासाठी आली होती. त्यांनी शेजारी राहणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलीला चॉकलेट, खाऊ, तसेच खेळण्यासाठी मोबाइल देऊन लळा लावला. त्यानंतर, चॉकलेट देण्याच्या आमिषाने १२ वर्षीय मुलाने आपल्या आईच्या सांगण्यावरून मुलीला घरापासून लांब टॉवरलाइन येथे नेले. तेथे उभ्या असलेल्या विमल हिने मुलीला रिक्षातून रूपीनगर येथे नेले. तेथून पतीच्या मदतीने मुलीला जुन्नर येथे घेऊन गेले.
मुलगी हरविल्याची तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चिखली परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यावेळी आरोपी मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तातडीने आपले पथक जुन्नरकडे रवाना केले, तसेच याविषयी ग्रामीण पोलिसांना माहिती देऊन आरोपींना ताब्यात घेण्यास सांगितले. ग्रामीण पोलीस पथकाला व्हॉट्सॲपवर मुलीचा आलेला फोटो आणि चौगुले दाम्पत्याकडे असलेली मुलगी एकच असल्याचे लक्षात येताच, त्यांनी चौगुले दाम्पत्याला अटक केली.