पिंपरी : चिमुकल्या मुलीची एक्सरे तपासणी करत असताना मशीन फुटल्याने चिमुकली भाजली. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीतील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शार्वी भूषण देशमुख (वय 1) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शावीर्ला युरिन इन्फेक्शन झाल्याने तिच्यावर मागील एक महिन्यापासून सांगवी येथील भालेराव चिल्ड्रन हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. भालेराव हॉस्पिटलमधून शार्वीच्या पालकांना काही तपासण्या करण्यास सांगितले. हॉस्पिटलकडून पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर मधून तपासण्या करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार, शार्वीच्या पालकांनी तिला पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आणले. दुपारी साडेतीनच्या सुमारास शार्वी ला तपासणीसाठी लॅबमध्ये घेतले. शार्वीची तपासणी सुरू असताना अचानक एक्सरे मशीनचा काही भाग फुटला. फुटलेल्या भागातून विशिष्ट प्रकारचे रसायन सांडले. हे रसायन शार्वी, तिची आई आणि आजोबांच्या अंगावर सांडले. त्यात शार्वी किरकोळ जखमी झाली. मशीनमधून रसायन सांडल्यानंतर सेंटरमधील कोणीही मदतीसाठी धावले नाही. सेंटरमधील डॉक्टरांनी या घटनेत हलगर्जीपणा दाखवला असून कोणीही मदतीस आले नाही. 'तुमच्या घरी झाले असते तर काय केले असते' असे डॉक्टरांनी उद्धटपणे सांगितले असल्याचे शावीर्ची आई प्रियंका यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित असल्याने थेट गुन्हा दाखल करता येणार नाही. याबाबतची कागदपत्र ससून रुग्णालयाच्या समितीकडे पाठविणार आहे. त्या समितीचा निर्णय आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्युब फुटल्याने त्यातील तेल अंगावर उडाले आहे. आमच्या कर्मचा?्यांनी त्वरीत बाळाच्या अंगावर पाणी टाकून प्रथमोपचार केले. तसेच या घटनेत आमच्याकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. हा केवळ एक अपघात आहे.- गिरीश मोटे, न्यूक्लिअस डायगणोस्टिक सेंटरचे अधिकारी.
पिंपरीत एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 11:31 AM