पिंपरी : शहरात विविध रंगांचे किल्ले दाखल झाले आहेत. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची मूर्ती, मावळे, गवळणी, सैनिक असे अनेक चित्रे सुद्धा विक्रीस ठेवण्यात आली आहेत. पूर्वी मातीचे किल्ले घरोघरी तयार केले जात असे. दिवाळीच्या सुट्यांमधे मुलांसाठी ही उत्साहाची आणि आवडीची गोष्ट असत. सध्याच्या स्मार्ट फोनच्या जगात मुले व्हर्च्युअल गेम्स मध्येच अधिक रमत असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा उत्साह कुठेतरी कमी होत चालला असल्याचे चित्र आहे. दिवाळीतील हे दृश्य इतिहासजमा होत चालले आहे.
दिवाळी म्हंटले की सर्वत्र किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होत असे. आपला किल्ला सुबक कसा करता येईल याकडे प्रत्येकजण बारकाईने लक्ष देत असे. दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या की किल्ला तयार करण्याची लगबग सुरू होत असते. सध्याच्या सिमेंटच्या जंगलामध्ये मात्र हे फरश्या मोकळ्या जागा राहिल्या नसल्याने तसेच फ्लॅट सिस्टीमचे पेव फुटल्याने किल्ला बनविण्यासाठी जागाच उरल्या नाहीत. त्यामुळे आता एक परंपरा म्हणून बाजारातून पीओपीचा किल्ला विकत घेण्यावर नागरिक भर देत आहेत.
२५० रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत किंमत
बाजारात पीओपीचे तयार किल्ले दाखल झाले आहेत. यात २५० रुपयांपासून ते पाच हजार रुपये किमतीचे किल्ले आहेत. राजस्थान येथील कारागीर शहरात हे किल्ले बनवतात. साचाच्या साहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या या किल्ल्यांना संपूर्ण तयार होण्यासाठी साधारण आठवडाभराचा कालावधी लागतो. या किल्ल्यांबरोबरच केवळ किल्ल्याचा दरवाजा तसेच किल्ल्याचे बुरुजसुद्धा विक्रीस ठेवले आहेत.
''गेल्या काही वर्षांपासून तयार किल्ल्यांना मागणी वाढली आहे. फ्लॅट सिस्टीममुळे दारासमोर फारशी जागा नसल्याने तयार किल्ले घेण्यावर नागरिकांचा भर आहे. विविध आकारांचे किल्ले विक्रीस उपलब्ध आहेत. दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी हे किल्ले तयार केले जातात. या किल्ल्यांबरोबरच शिवाजी महाराजांच्या विविध मुर्ती सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत. - संजय चौधरी, कारागीर''
''वाढत्या शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृती शहराला आली. याआधी चाळी, गावठाण परिसर असल्याने मुलांना किल्ले बनविण्यासाठी जागा असायची. मात्र, आता ती कमी झाल्याने किल्ले बनवायचा कुठे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना असतो. विद्यार्थ्यांना जागा मिळाली तर त्यांना छंद जोपासता येईल. - अशोक वायकर, किल्ले बनवा स्पर्धा आयोजक''