पुणे : आई आणि चिमुकल्या मुलींची ताटातूट नंतर रडण्याचा आवाज आणि जवळपास दोन तासानंतर आई-वडीलांना पाहिल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आईने मारलेली घट्ट मिठी. चिमुकल्या मुली आपल्या आईच्या कुशीत स्थिरावल्यानंतर पोलिस आणि काही सतर्क नागरिक ज्यांनी त्या मुलींची समजूत काढली होती त्यांच्या चेहऱ्यांवरही आनंद होता. दिवसाची सुरूवात एका चांगल्या कामाने झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.
ही घटना आहे सिंहगड एक्सप्रेसमधली. पुण्यातून ट्रेन निघाली. चिंचवड स्टेशन आले, दिवाळीमुळे स्टेशनवर गर्दीचा उच्चांक झाला होता. अशात एक कुटूंब आपल्या लहान मुलींना घेऊन ट्रेनमध्ये चढत होते. मुलींना त्यांनी गाडीत बसवले पण स्वतः त्यांनाच ट्रेनमध्ये चढता आले नाही. त्यानंतर लगेच त्यांनी जवळील आरपीएफ जवानांकडे मदत मागितली. त्यांनी लोणावळामधील जवानांशी संपर्क साधून ही घटना कानावर घातली. लोणावळा आल्यानंतर तेथील जवानांनी त्या मुलींना आपल्या ताब्यात घेतले. तेथील स्टेशन मास्तरांकडे मुलांना नेण्यात आले. काही वेळांनी पालक लोणावळ्यात आल्यानंतर त्यांची भेट झाली.
सिंहगड एक्स्प्रेसला चिंचवडनंतर थेट लोणावळा येथे थांबा आहे. त्यामुळे ट्रेन लोणावळा येथे थांबली असता ट्रेन मधील काही प्रवाशांनी त्या मुलींना पोलिसांच्या ताब्यात दिले. तोपर्यंत पालक मागून लोकलने लोणावळ्याला गेले. लोणावळा येथे पालकांची आणि मुलींची भेट झाली.