पिंपरी : ज्युडसन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या स्वरूपातील गुन्हेगारी घटनेत झाले. अन्य काही मुलांशी भांडण झाले हे समजताच एका मुलाचे पालक अन्य काही नातेवाईक, साथीदारांना घेऊन शाळेत गेले. तेथे त्यांनी झाडाच्या कुंड्या फोडल्या. नोटीस बोर्ड तोडून टाकले. शिवीगाळ केली. शाळेतील गोंधळाचे वातावरण पाहून विद्यार्थी सैरभर पळू लागले. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी थरार शाळेतच अनुभवला.पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ रज्जाक कुरेशी (वय ३९), इस्माईल कुरेशी (वय २३), दोन अल्पवयीन मुले आणि अन्य चार आरोपींविरोधात शिक्षिका सुजाता विभूती भूषण (वय ५७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. कुरेशी, तसेच त्यांच्या भावाची मुले आणि अन्य साथीदार यांनी, एकेका शिक्षकाला बघून घेतो. शाळा कसे चालवतात, तेच बघू अशा शब्दांत धमकावत शाळेच्या आवारात गोंधळ घातला. आवारातील वस्तूंची तोडफोड केली. शाळेत घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले. असुरक्षित वाटू लागल्याने विद्यार्थी सैरभर पळू लागले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
मुलांनी शाळेत अनुभवला थरार
By admin | Published: March 25, 2017 3:46 AM