पिंपरी : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्रगणक म्हणून मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील (आयटीआय) विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या महत्त्वाच्या कामाबाबत विद्यार्थ्यांना पुरेपूर माहिती नसल्याने विद्यार्थीही गोंधळून जात आहेत. शिवाय यामध्ये अठरा वर्षे पूर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुले औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतात. येथे शिक्षण घेतल्यानंतर कंपनीत नोकरी मिळण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. अशाच प्रकारे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी मोरवाडीतील आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. मात्र, येथील विद्यार्थ्यांवर गेल्या चार दिवसांपासून ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रगणकाचे काम देण्यात आले आहे. ही जबाबदारी इच्छा नसतानाही जबरदस्तीने दिली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या कामकाजाबाबत पुरेपूर माहिती नाही. शहरातील भौगोलिक स्थिती माहिती नसतानाही दूर दूर अंतरावरील काम देण्यात आले आहे. ज्या भागातील काम देण्यात आले आहे, तेथील साधा पत्ताही विद्यार्थ्यांना माहिती नाही. ठिकठिकाणी स्वखर्चानेच विद्यार्थ्यांना फिरावे लागते. अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने असे विद्यार्थी पायीच फिरतात. शिवाय माहिती घेण्यास गेल्यानंतरही समोरच्या व्यक्तीकडून माहिती दिली जात नाही. ‘या कामासाठी महापालिका कर्मचारी, शिक्षकांना नेमण्यात आले आहे, तुम्ही कुठून आलात’ असे सुनावत विद्यार्थ्यांना माहिती दिली जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्यांना आदेशाची प्रत देण्यात आली आहे. त्यामध्ये ‘हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने बिनचूक पूर्ण करायचे आहे. टाळाटाळ केल्यास कारवाई केली जाईल’ असे नमूद आहे. मात्र, पुरेशी माहिती नसलेल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे महत्त्वाचे काम देण्यात आल्याने त्यांच्याकडून बिनचूक काम होईल, याची काय शाश्वती असा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र नाही. एखाद्या घरी माहिती घेण्यासाठी ते गेले असता, ओळखपत्राची मागणी केली जाते. (प्रतिनिधी)
पालिकेने लावले अल्पवयीन मुलांना काम
By admin | Published: December 22, 2015 1:14 AM