पुणे/पिंपरी : द्राक्ष पीकांसाठी चीन ही महत्वाची बाजारपेठ आहे. मात्र, कोरानामुळे आलेल्या निर्बंधामुळे निर्यात झाली नाही. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम पीकावर झालेला आहे. द्राक्ष पीकात महाराष्ट्र देशात अग्रणी असून २ टक्के निर्यात केली जाते. तसेच ९८ टक्के स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे विकली जातात. स्थानिक बाजारपेठ मजबूत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांनी वाकड येथे रविवारी व्यक्त केली .
बंगळूर- पुणे-मुंबई महामार्गावरील वाकड येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेचा मेळावा झाला, उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, कृषी आयुक्त धीरज कुमार, डॉ. आर. जी सोमकुअर, डॉ. एस जैन, डॉ.अनुपम कश्यपी, सोपान कांचन, संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, चेअरमन चंद्रकांत लांडगे, डॉ. जी. एस प्रकाश, भारत शिंदे, कैलास मोते, मगर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘शेती व्यवसायात भविष्यात आधुनिकता कशी आणता येईल. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ही जबाबदारी सरकारची आहे. विज्ञान आणि शेतीचा समन्वय साधण्याची गरज आहे. तसेच द्राक्ष बागायतदारांप्रमणेच आंबा, केळी अशा पीकांच्या संघटना निर्माण होण्याची गरज आहे. द्राक्ष निर्यात, वाईन, बेदाणा यांचबरोबर ज्यूस आणि कोल्ड स्टोरेज आणि टेक्नॉलॉजी यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’’
तर शेतकरी आत्महत्येकडे वळतो
पवार म्हणाले, ‘‘शेती अर्थशास्त्र, अर्थकारण, अर्थव्यवस्था हे जर व्यवस्थित राहिले नाही. तर कर्जाच्या बोजाखाली निराश झालेला माणुस आत्महत्येच्या विचाराकडे जात असतो. हे चित्र शेतीच्या, देशाच्या दृष्टीने चांगले नाही. शेतीवरील खर्च कमी करणे, मर्यादित मनुष्य बळात उत्तम शेती करणे त्याचबरोबर जोड व्यवसायांचा विचार करण्याची गरज आहे.
धीरज कुमार म्हणाले, ‘‘दोन वर्षात अडीच हजार कोटींचा एक्स्पोर्ट झाला आहे. देशात ४४ हजार शेतकरी एक्सपोर्ट केला आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र आणि एक्सपोर्ट महाराष्ट्रातून केला जात आहे. ते प्रमाण ९८ टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला तारण्याचे काम शेतकºयांना केले आहे. ३८ लाख हेक्टर वर फळलागवड झाली. आता रोजगार हमी योजनेअंतर्गत द्राक्ष लागवडीसाठीही अनुदान दिले जात आहे.’’
शिवाजी पवार प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘बारामतीमधून १९६० पासून संघाची सुरुवात झाली. संघाचे ३२ हजार सभासद आहे. देशात एकूण निर्यात होणाºया द्राक्ष पिकात ९८ टक्के पीक हे महाराष्टÑातील आहे. जागतिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला जातो. यापुढे गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.’’ दरम्यान, पंकज महाराज गावडे यांनी सूत्रसंचालन केले.