पिंपरी :चिंचवडचेभाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर लगेच पोटनिवडणूक बुधवारी जाहीर झाली. त्यामुळे आमदार जगताप यांच्यानंतर त्यांचे भाऊ शंकर जगताप निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. सहानुभूतीच्या लाटेवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे; परंतु विविध पक्षांकडून उमेदवार रिंगणात उतरविण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध की थेट लढत होणार, याविषयी कार्यकर्ते व नागरिकांना उत्सुकता आहे.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला निधन झाले. तसेच त्यापूर्वी पुण्यातील कसबा पेठेतील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. या दोन्ही जागांच्या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून जाहीर झाली आहे. त्यामुळे दिवंगत विद्यमान आमदारानंतर कोण? चिंचवडचे प्रतिनिधित्व करणार अशी चर्चा रंगली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा मतदार संघ चिंचवड विधानसभा आहे. याची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून आमदार लक्ष्मण जगताप हे आमदार आहेत. एकदा अपक्ष व दोनदा भाजपाकडून त्यांनी निवडणूक जिंकली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दुरंगी लढत झाली होती. जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील एक गट, वंचित बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यावर राहुल कलाटे यांनी अपक्ष चिन्हावर निवडणूक लढविली. त्यात जगताप यांना १ लाख ५० हजार ७२५ तर कलाटे यांना १ लाख १२ हजार २२५ मते मिळाली होती. त्यानंतर साडेतीनच वर्षांतच जगताप यांचे निधन झाले. त्यामुळे पुढील दीड वर्षासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादीकडून इच्छुकांची भाऊगर्दी
सहानुभूतीमुळे निवडणूक बिनविरोध होणार की थेट लढत होणार, याचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. मात्र, निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार दिला जाणार, यावर राजकीय आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. जगताप यांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे, राष्ट्रवादीमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे व नवनाथ जगताप हे इच्छुक आहेत. अद्याप महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी, काँग्रेस की शिवसेना यांंच्यापैकी कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार, तसेच, शहरातील बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते व खासदार श्रीरंग बारणे यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांतून इच्छुकांची भाऊगर्दी असून, संबंधित स्थानिक नेत्यांनी सोशल मीडियावर शड्डू ठोकले आहेत.