पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी करण्यात आली. निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. भाजपचे पर्यायी उमेदवार शंकर जगताप आणि आम आदमी पक्षाचे मनोहर पाटील यांनी एबी फॉर्म न दिल्याने अर्ज बाद झाले. एकूण सात जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्जांची छाननी थेरगावातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत छाननी झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी पात्र आणि अपात्रेची माहिती दिली. निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. तर, सात उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहेत.
अर्ज झाले अपात्र
भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज पात्र झाल्याने पर्यायी उमेदवार शंकर जगताप यांचा अर्ज अपात्र झाला. उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा बी फॉर्म अपूर्ण असल्याने आम आदमी पक्षाचे मनोहर पाटील यांचा अपात्र झाला. प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने अपक्ष चेतन ढोरे, पुरेशा सूचकांची स्वाक्षरी नसल्याने अपक्ष गणेश जोशी, आवश्यक सूचकांची नावे नसल्याने उमेश म्हेत्रे, उमेदवारी अर्ज अपूर्ण आणि एबी फॉर्म नसल्याने प्रकाश बालवडकर आणि अनामत रक्कम भरली नसल्याने संजय मागाडे अशा सात जणांचे उमेदवारी अर्ज अपात्र झाले.
कोण झाले पात्र?
भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, बहुजन भारत पक्षाचे तुषार लोंढे, महाराष्ट्र लोकहितवादी पक्षाचे प्रफुल्ला मोतिलिंग, आजाद समाज पक्षाचे मनोज खंडागळे, बहुजन मुक्ती पक्षाचे सतीश कांबिये, बहुजन भिम सेनेचे मोहन म्हस्के तर अनिल सोनावणे, मिलिंद कांबळे, अजय लोंढे, रफिक कुरेशी, रवींद्र पारधे, बालाजी जगताप, गोपाळ तंतरपाळे, अमोल सूर्यवंशी, सिद्धीक शेख, किशोर काशीकर, डॉ. मिलिंदराजे भोसले, सोयलशहा शेख, हरिश मोरे, जावेद शेख, राजेंद्र काटे, श्रीधर साळवे, राजू काळे, दादाराव कांबळे, मनिषा कारंडे, चंद्रकांत मोटे, सुधीर जगताप, सतीश सोनावणे, भाऊ अडागळे, सुभाष बोधे यांचे अर्ज पात्र झाले आहेत.