पिंपळे गुरव (पुणे) : आधी लगीन कोंढाण्याचे... या छत्रपती शिवरायांच्या वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कर्तव्यनिष्ठेप्रमाणेच जुनी सांगवी येथील एका नवरदेवाने लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचे कर्तव्य पार पाडून आदर्श लोकशाहीप्रति असलेली निष्ठा दाखवून दिली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे लागलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत सर्वांसमोर एक आदर्श उभा केला.
छायाचित्रकार राजकुमार कांबळे यांचा मोठा मुलगा प्रेम याचे रविवारी मतदानाच्या दिवशी दुपारी एक वाजता पुण्यातील नऱ्हे येथील मधुरा या वधूशी लग्न होते. लग्न घटिका भरत आली असतानाही वऱ्हाडी, पाहुणे व नातलग यांना आधी मतदानाचा हक्क आणि नंतर मी बाेहल्यावर उभा राहतो, असे प्रेम याने आपल्या आप्तेष्टांना कळविले आणि त्यानंतर त्याने मुंडावळ्या, फेटा, पोशाख परिधान केलेल्या स्थितीत सांगवी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यामुळे राष्ट्र कर्तव्य व आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराला प्रथम कर्तव्य समजत एक वेगळे मूर्तिमंत उदाहरण समाजासमोर उभे केले.
या सर्व प्रसंगाला त्याचे वडील राजकुमार कांबळे, आजी नलिनी शिंदे, भाऊ रणजित कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे साक्षीदार होते. यामुळे परिसरातून नवरदेव व कुटुंबियांचे कौतुक होत आहे. मतदान कर्मचारी, पोलिसांनी त्याच्या या निर्णयाचे शुभेच्छा देऊन कौतुक केले.