पिंपरी : विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सट्टेबाजार तेजीत आहे. प्रचारात कोणत्या पक्षाचा जोर आहे, यावरून त्या पक्षाच्या उमेदवारावर सट्टा लावण्यात येत आहे. त्यासाठी सट्टेबाज आणि बुकीदेखील ॲक्टिव झाले आहेत.
चिंचवड मतदारसंघातील निवडणूक रिंगणात २८ उमेदवार आहेत. मात्र, असे असले तरी भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आहे. या तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. सर्वच पक्षांनी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने कसबा तसेच चिंचवड मतदारसंघात देखील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा, बैठका होत आहेत. स्टार प्रचारकांच्या रॅलीमुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यावर मतदारांप्रमाणेच सट्टेबाजांचेही लक्ष आहे. गेल्या दोन दिवसांपासून चिंचवड मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनीही शहराचा दौरा केला.
प्रचार शिगेला पोहोचला असल्याने शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी सट्टेबाजांकडून निवडणुकीबाबत अंदाज लावण्यात येत आहेत. प्रत्येक सभा, बैठक, रॅली, कोपरासभा यावर सट्टेबाजांचे लक्ष आहे. कोणत्या सभेला किती प्रतिसाद मिळतो, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे. ज्या उमेदवाराची निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता आहे त्याच्यावर कमी पैसे लागतात. अर्थात या उमेदवाराला सट्टेबाजांकडून सर्वाधिक पसंती दिली जाते. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारावर थोडे जास्त पैसे लावले जातात.
मतमोजणीच्या दिवशी मोठी उलाढाल
प्रचारात सुरू झालेला हा सट्टा बाजार मतदानाच्या दिवशी देखील तेजीत असतो तसेच मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील त्यात विजयी उमेदवारासाठी मोठा सट्टा लावला जातो. क्षणाक्षणाला अंदाज बदलत असतात. त्यानुसार सट्टाबाजारातील उलाढाल होत असते.
दररोज बदलतेय चित्र
चिंचवड मतदारसंघातील तिरंगी लढतीमुळे सट्टाबाजारात देखील विजयी उमेदवाराच्या अंदाजाबाबत अनिश्चितता आहे. दररोज प्रत्येक उमेदवारांचा सट्टेबाजारातील भाव बदलत आहे. त्यामुळे सट्टेबाजांचीही धडधड वाढत आहे. कसबा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत रंगली आहे. या मतदासंघात देखील उमेदवारांचा सट्टेबाजारातील पसंती क्रम सातत्याने बदलत आहे.