पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजय साकार केला आहे. ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात होती. या लिटमस टेस्टमध्ये भाजपला पास होण्यात यश मिळाले, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने काठावर पास होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
चिंचवड विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यापासूनच महाविकास आघाडीत मोठी चुरस होती. भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत सहानुभूतीवर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, तर महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला. तरीही बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याने अखेर शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर महाविकास आघाडीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या (शिवसेना) नेत्यांनी प्रतिष्ठेची केली. त्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारणीभूत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. या मतदारसंघामध्ये महापालिकेचे १३ प्रभाग येतात, तर या मतदारसंघामधून तब्बल ५३ नगरसेवक महापालिकेच्या सभागृहामध्ये निवडून जातात. त्यामुळेच महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी हा मतदारसंघ मैलाचा दगड ठरतो. या मतदारसंघामध्ये आमदार असल्यावर त्या पक्षाला नगरसेवकांची मोट बांधणे सहज शक्य होते. त्यासाठीच भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने हा गड ताब्यात घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामध्ये भाजपला यश आले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
नेत्यांच्या प्रचाराने मविआला बूस्टर
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत जोरदार प्रचार करत शहरामध्ये मविआची हवा केली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक प्रचारामध्ये जोर घेत ‘मविआ’ने दुरंगी केली. राज्य पातळीवरील नेत्यांनी शहरामध्ये येत सभांचा धडाका आणि बैठका घेतल्याने ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांमध्ये देखील महापालिका निवडणुकीसाठी उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे.
चिंचवडमधील नगरसेवक संख्या : ५३
भाजप : ३४
राष्ट्रवादी : ०९
शिवसेना : ०६
अपक्ष : ०४