पिंपळे सौदागर (पुणे) :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने मिळविलेला विजय हा सहानुभूती वा विकासाच्या जोरावर नाही, तर संपूर्ण मतदारसंघात वापरलेल्या पैशाच्या जोरावर मिळविला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना काटे यांनी केला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला असून, या तिरंगी लढतीत भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या विजयी झाल्या.
नाना काटे म्हणाले, “सहानुभूतीच्या जोरावर ही निवडणूक जिंकता येणार नाही याची भाजपाला जाणीव होती. त्यामुळे त्यांनी पोलिस बळाचा वापर करून मतदानाच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन प्रचार यंत्रणेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अपक्ष उमेदवारामुळे महाविकास आघाडीला फटका बसला यालाही नाना काटे यांनी दुजोरा दिला. वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीची मते अपक्ष उमेदवारास मिळाली आणि मतांची विभागणी होऊन त्याचाही फायदा भाजपा उमेदवारास मिळाल्याचे काटे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून माझा प्रचार केला. राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानत यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जोमाने पक्ष संघटनावर भर देण्यात येणार असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.