पिंपरी : शेठ काय म्हणतील, तेवढंच ऐकायची तयारी ठेवावी लागेल. संविधानातील तरतुदीही बदलण्याची तयारी सुरू आहे. भारतीय लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळे सौदागर येथे जयंत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, डॉ.किरण लहामटे, माजी आमदार विलास लांडे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेबूब शेख, संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाला हाताला धरून शिवसेनेची हत्या केली. यानंतर, स्थानिक पक्ष संपविले जातील. आम्ही १० वर्षे विरोधात राहिलो, तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही. पुढील दहा वर्षांत लोकशाही टिकणार नाही. देशात सुधारणा काय केल्या, यावर चर्चा नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीवर कोणी बोलत नाही. विकृती असणाऱ्या लोकांच्या हातात सध्या भाजप पक्ष गेला आहे. लोकसभेतील प्रश्नावर मोदींकडे उत्तरे नाहीत. एलआयसीमध्ये सामान्य नागरिकांनी आयुष्याची पुंजी गुंतवली ती धोक्यात आली आहे. न्यायव्यवस्थाही दबावात काम करत आहेत. न्याय देणारा माणूस माझ्या मताचा असला पाहिजे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे. युट्युब चॅनेलवरही बंदी येत आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
आमदार डॉ.किरण लहामटे म्हणाले, सामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. पिंपरी-चिंचवडचा विकास ही पोहोचपावती आहे. भाजपने आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. महाविकास आघाडीच ठोस काम करेल.