पिंपरी :चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे अर्थपूर्ण हालचालींना वेग आला आहे. यात मतांचा रेटही फिक्स झाल्याची चर्चा आहे. त्यात दीड हजारांपासून ते अडीच हजार रुपये प्रतिमतदार असे पैसे वाटले जात आहेत आणि एका पक्षाकडून संसारोपयोगी साहित्याचे वाटप मतदानाच्या दिवशी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक सुरुवातीला सोपी वाटत होती. मात्र, नंतर राज्यातील धुरंधर नेत्यांसह देशातील नेतेही यात उतरल्याने या निवडणुकीला प्रतिष्ठेचा रंग चढला आहे. रविवारी (दि. २६) मतदान होणार आहे. त्याआधी या सगळ्या मतदारसंघांत प्रचाराच्या सभाही झाल्या. पूर्वी अशा सभांना उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते आणि नेत्यांना ऐकण्यासाठी लोक जमा होत असत; परंतु आता हा ‘ट्रेन्ड’ बदलला. आता पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांना सभा ऐकण्यासाठी प्रेक्षक ‘हायर’ करावे लागले. ही माणसे जमा करण्याचे काम प्रत्येक पक्षाने त्या-त्या भागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सोपवले होते. त्यातच आता या कार्यकर्त्यांवर मतदारांना अर्थपूर्ण संदेश देण्याचे कामही हे कार्यकर्ते करणार असल्याची चर्चा आहे.
झिरो कार्यकर्त्यांकडून लिस्ट तयार...
मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांकडून विभागानुसार लिस्ट मागवण्यात येत आहे. आपल्या पक्षाला कोणत्या परिसरातून किती मतदान मिळणार आहे, त्यानुसार रेट आता फुटला आहे. दीड ते अडीच हजारांदरम्यान भाव फुटल्याचे बोलले जात आहे. मतदान जसे जवळ येईल तसे हा भाव वधारू शकतो. ‘झिरो कार्यकर्त्यां’नीही ‘बिझनेस माईंड’ने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उपनगरांसह सगळीकडे अशा ‘झिरो कार्यकर्त्यां’नी लिस्ट तयार केली असून, ‘मागणी तसा पुरवठा’ ही ‘बेसलाईन’ ठेवून ही सगळी तयारी पॉलिटिकल ‘ठेकेदारांनी’ सुरू केली आहे.
मतावर मिळणार वस्तू...
मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले जात आहे. त्यातच विभागानुसार वस्तू की पैसा, याचाही कार्यकत्यांनी सर्व्हे केला आहे. त्यात कूकर, मिक्सर, गॅस शेगडी आदी वस्तू वाटण्यात येणार आहेत. तर सोसायट्यांतील मतदारांना पैसे वाटण्यात येणार आहेत. त्यात एका कुटुंबातील तीन मतांसाठी कूकर तर चार-पाच मतांसाठी गॅस शेगडी व रोख रक्कम असे वाटण्यात येणार असल्याची चर्चा आहे.