पिंपरी : अश्विनी जगताप विजयी होतील की नाही, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात होते. राष्ट्रवादी ज्या त्वेषाने प्रचार करत होती. ते पाहून ही लढत एकांगी नाही, असे दिसत होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगवीमध्ये घेतलेल्या सभेने सारे वातावरण फिरले. पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्याचा ‘शब्द’ दिला. अन् अश्विनी जगताप यांनी विजयाचे पहिले पाऊल टाकले. अन् मतदारांनी भाजपला कौल दिला.
चिंचवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे बडे नेते प्रचारासाठी उतरलेले बघायला मिळाले. रोड शो, सभा यांच्यासोबतच रात्रंदिवस वेगवेगळ्या घटकांसोबत बैठकांचे सत्रही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगवीतील सभेत त्यांनी शास्ती कर माफ करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगून ‘मास्टर स्ट्रोक’ मारला. अन् त्या ठिकाणी भाजपचा मार्ग सुकर झाला. त्याचबरोबर शास्ती कर माफी, सोसायटीधारकांचे प्रश्न, स्थानिक मुद्दयांना भाजपने हात घातल्याने भाजपचा विजय झाला.
महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांमधले मोठे नेते प्रचारात पाहायला मिळाले. शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांसारखे सहभागी झाले. भाजपकडून मोठे नेते प्रचारात होते पण त्याचसोबत भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावलेली दिसून आली. प्रभागांमध्ये त्यांनी नगरसेवकांवर जबाबदारी दिली. राज्यस्तरीय नेते जसे की देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे नेते सक्रिय होते. गिरीश महाजन आणि रवींद्र पाटील या हे ग्राऊंड लेवलवर काम करताना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार-पाच दिवस चिंचवड आणि पुण्यातच होते. त्याचसोबत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सात, आठ दिवस मुक्कामी राहिले. रात्रंदिवस बैठका घेतल्या जात होत्या. त्यामुळे चिंचवडची निवडणूक चुरशीची झाली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराचे मुद्दे
-२४ तास पाणीपुरवठा
-पिंपरी-चिंचवडमधील शास्ती करमाफी
-पीएमआरडीएच्या साडेबारा टक्के परताव्याचा विषय
-पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचा विषय
भाजपने यावर भर दिला....
-मतदारसंघात स्थलांतरित मतदारांची संख्या मोठी असल्याने त्यांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न
-गेल्या निवडणुकीत भाजपला कमी मताधिक्य मिळालेल्या किवळे, पुनावळे पट्टयावर लक्ष केंद्रित
-नवीन इमारती झालेल्या जमीन मालकांमधील शीतयुद्ध मिटवत सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न