पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. भाजप, महाविकास आघाडी यांच्यासोबतच अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले आहे. गुरुवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. तर आता अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. विहित मुदतीत ७ फेब्रुवारीपर्यंत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. बुधवारी अर्जांची छाननी केल्यानंतर ४० उमेदवारांपैकी ७ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे. त्यामुळे आता ३३ उमेदवार मैदानात आहेत. भाजप, महाविकास आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन भारत पार्टी, संभाजी ब्रिगेड पार्टी, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी, आझाद समाज पार्टी या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहे. तर अपक्षदेखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत यापैकी एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारदेखील निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
अपक्षांमध्ये अजय लोंढे, बाबू सोनवणे, अमोल (देविका) सूर्यवंशी, राहुल कलाटे, किशोर काशीकर, गोपाळ तंतरपाळे, चंद्रकांत मोटे, जावेद शेख, दादाराव कांबळे, बालाजी जगताप, सुभाष बोधे, भाऊसाहेब अडागळे, डॉ. मिलिंदराजे भोसले, ॲड. मनीषा कारंडे, मिलिंद कांबळे, मोहन म्हस्के, रफिक कुरेशी, रवींद्र पारधे, रविराज काळे, राजेंद्र काटे, सोयलशहा शेख, सतीश सोनावणे, सिद्धिक शेख, मुधीर जगताप, श्रीधर साळवे, हरीष मोरे यांचा समावेश आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामध्ये किती अपक्ष उमेदवार माघार घेतात त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.