पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघात गावकी आणि भावकीचे राजकारण आहे. पक्ष कोणताही असो मैत्री आणि स्रेहबंध जपण्याचे काम येथील स्थानिक नेत्यांनी आजवर केले आहे. दिवसा पक्षाच्या व्यासपीठावर आणि रात्री मैत्री आणि नाते सांभाळण्याचे काम राजकीय नेते करीत असल्याचे दिसून येत आहे. चिंचवड विधानसभेत असाच रात्रीस खेळ सुरू आहे.
गाव ते महानगर आणि महानगर ते मेट्रोसिटी असा शहराचा प्रवास आहे. त्यामुळे गावकी भावकीच्या राजकारणाचा परिणाम आणि प्रभाव राहिला आहे. चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात एकूण २८ उमेदवार आहेत. त्यात भाजप, शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे अशा विविध पक्षात स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. स्थानिकांचे आणि नात्यागोत्याच्या राजकारणाचा परिणाम आणि प्रभाव राजकीय समीकरणावर राहिला आहे. तो ठळकपणे दिसून येत आहे.
तीनही प्रमुख उमेदवार स्थानिक
भाजपकडून आमदार पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे रिंगणात आहेत. त्याच्या प्रचारफेरी आणि बैठकांमध्येही नातेगोते दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी, मावळ, मुळशी आणि खेड मतदार संघात या नेत्यांची गावकी आणि भावकी, नातेगोते आहे. त्यामुळे भोसरीतील राष्ट्रवादीचे काही नेते दिवसा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आणि रात्री भाजपच्या गुप्त बैठकांना उपस्थित लावत होते. तर पिंपरीतील राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक दिवसा पक्षाच्या व्यासपीठावर आणि कार्यक्रमात तर रात्री मैत्री जपत असल्याचे दिसून येत आहे. मुळशीतील शिवेसनेचे पदाधिकारी असणारे चिंचवडमध्ये दिवसा महाविकास आघाडी आणि रात्री भाजप आणि अपक्षाच्या बैठकांना हजर असल्याचे दिसून येत आहे. मावळातील भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते हेही दिवसा एकीकडे तर रात्री दुसरीकडे दिसून येत आहेत.
नगरसेवकांचे डीपी पक्षाचे, कार्यकर्त्यांचे डीपी विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे
भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे नेत्यांच्या दबावामुळे आणि काही महिन्यातच महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने नगरसेवक आणि पदाधिकारी यांचे डीपी पक्षाचे आहेत. मात्र, कार्यकर्ते आवडत्या नगरसेवकाच्या मित्रांचा प्रचार डीपीतून करीत असल्याचे दिसून येत आहे.