पिंपरी :चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह शहरातील विविध ३४ संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ‘‘भाजप पक्षाचा ब्राह्मण समाजाबद्दलचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय, तसेच पक्ष स्थापनेपासून द्वेष करणाऱ्या स्वत:ला सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला मत देण्यापेक्षा ब्राह्मण समाजाने कलाटे यांना मतदान करण्याचे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि कसब्यातील उमेदवार आनंद दवे यांनी केले आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शिट्टी या चिन्हावर राहुल कलाटे लढवित आहेत. शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांची केलेली हकालपट्टीही गुरुवारी मागे घेतली आहे. याविषयी आनंद दवे म्हणाले, ‘‘२१ आमदार असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी असावा, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे. मागील वेळी कोथरुड व आता कसबा मतदार संघात समाजातील प्रतिनिधींना संधी नाकारली. त्यामुळेच नाराजी तयार झाली. या सगळ्याकरिता भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे.’’
या संस्थांनी दिला पाठिंबा
ब्राह्मण महासंघ, भारतीय पार्टी (लोकतांत्रिक), ख्रिस्ती नवनिर्माण सेना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, दलित पॅन्थर सेना, गोंधळी समाज विकास सेवा संघ, सम्राट अशोक सेना, स्वराज्यवादी बहुजन महासंघ, फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान, रिपब्लिकन जनशक्ती आणि बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र पुणे अशा ३३ संघटनांनी पाठिंबा दिला आहे.