चिंचवडची पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढवावी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:20 PM2023-01-21T15:20:26+5:302023-01-21T15:21:19+5:30
शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन ठराव केला...
पिंपरी :राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. पिंपरीतील बैठकीत स्थानिक नेते आक्रमक झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणीचा ठराव करून पक्षाला पाठविला आहे.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत बैठक झाली. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, श्याम लांडे, मयूर कलाटे, विनोद नढे, पंकज भालेकर, माया बारणे, संगीता ताम्हाणे, राजेंद्र जगताप, अरुण बोऱ्हार्हाडे, गोरक्ष लोखंडे, राजू लोखंडे, विनायक रणसुभे, फझल शेख, नारायण बहिरवडे उपस्थित होते.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, पोटनिवडणूक महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहायला हवी. पक्ष संघटन मजबूत असून बूथस्तरीय तयारी झाली आहे. शहरात आरएसएसचे प्राबल्य वाढत आहे. या गोष्टींना अटकाव घालण्याचे काम आपल्याला करायचे आहे.’
बैठकीत केला ठराव
शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन ठराव केला.
१) पुरोगामी विचाराच्या पक्षांचे, पुरोगामी संघटनांचे आणि कार्यकर्त्यांचे दमन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न या शहरात हाणून पाडण्यासाठी ही निवडणूक आपल्याला एक सुवर्णसंधी आहे.
२) शहराचा विकास घडवून राष्ट्रवादीने केला आहे. दुर्दैर्वाने काही अपरिहार्य राजकीय कारणांमुळे मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आपल्याला पराभूत व्हावे लागले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाहेरील उमेदवारास पाठिंबा दिला. राजकीय परिस्थिती पाहता भावनिक कारणामुळे किंवा राजकीय अपरिहार्यतेसाठी इतर पक्षांसाठी सोडू नये.
३) येत्या वर्षभरात महापालिका आणि लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत, यासाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि पक्षवाढीच्या दृष्टीने ही जागा राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असलेल्याने लढवायला हवी, अशी कार्यकर्त्यांची आणि आमची भावना आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढवावी, जागा लढताना पक्ष चिन्हावरच लढावी, उमेदवार हा राष्ट्रवादीचा असावा.
४) पाच वर्षांमध्ये पक्षाची खूप पडझड झाली आहे. या पडझडीमध्ये निष्ठा ठेवून प्रतिकूल काळात पक्षासोबत जी लोक राहिली त्यातील व्यक्तीचा विचार व्हावा.