पुणे : पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला दिवसेंदिवस रंगत येत आहे. आज (७ फेब्रुवारी) निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. तरीही मविआचा उमेदवार जाहीर झाला नव्हता. अर्ज भरायला काही तास उरले असताना राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. काटेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या निवडणुकीत सहानुभूतीचा विषय नाही. मुंबईची निवडणूक सोडली तर इतर तीन ठिकाणी (पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूर) भाजपची सहानुभूती कुठे गेली होती? त्यावेळी त्यांना सहानुभूती दिसली नाही का, असा सवालही अजित पवारांनी केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ते बोलत होते. अर्ज दाखल करण्यासाठी पिंपळे सौदागर येथून थेरगावमधील ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट आदि उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, " पोटनिवडणुकीत चिंचवड जागेसाठी आणि उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण एकमत झाले नाही. सकाळी सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. ते जाहीर केले. राहुल कलाटे उभे राहणार असले तरी आमचा अजूनही एकमत करण्याचा प्रयत्न आहे. सहानुभूतीचा विषय नाही. तीन निवडणुकामध्ये यांना सहानुभूती दिसली नाही. फक्त मुंबईमध्ये त्यांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक लढवावी हे सर्वांचे मत होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा राहील असे सांगितले आहे. या शहराशी माझा संबंध आहे. माझी राजकीय सुरुवात येथून झाली. त्यावेळी मी देशात पहिल्या क्रमांकाची मते घेतली होती. या शहराचा कायापालट केला. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे."