Chinchwad By Election | अमोल कोल्हे यांच्याकडून बंडखोर उमेदवाराच्या शिट्टीचा प्रचार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:17 AM2023-02-27T11:17:52+5:302023-02-27T11:19:01+5:30
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या शिट्टी या चिन्हाचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा म्हटले जात आहे...
पिंपरी :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील रणधुमाळी महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर निर्णायक क्षणी म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर एक व्हिडीओ व्हायरल झाला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या शिट्टी या चिन्हाचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा म्हटले जात आहे. मात्र, हा व्हिडीओ नागपूर किंवा अमरावती येथील कार्यक्रमांचा असून, तो कोणीतरी एडिट करून व्हायरल केल्याची माहिती खासदार कोल्हे यांच्या स्वीय सहायकाने दिली.
भाजपचे चिंचवड मतदारसंघातील दिवंगत खासदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिवसेनेचे पिंपरी महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला. शिट्टी हे चिन्ह घेऊन ते पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजप महायुती व महाविकास आघाडीचे नेते या प्रचारात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. शेवटच्या दोन दिवसांत प्रचार शिगेला पोहोचला असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बंडखोर उमेदवार कलाटे यांच्या शिट्टीचा उमेदवाराचे नाव न घेता प्रचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघांची मैत्रीही असल्याने त्याला पुष्टी मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. कोल्हे हे शिट्टी का वाजवावी, त्याचे महत्त्व काय, मतदारांनी मतदान देताना काय करावे, असे विचार मांडताना दिसतात. त्यामुळे ही खासदारांची बंडखोरी असल्याची चर्चा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सुरू झाली आहे.