पिंपरी :चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे बुधवार दुपारपासून आचारसंहिता जारी झाली आहे. पुणे जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने महापालिकेचा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणारा महापालिकेचा अर्थसंकल्प एक महिन्यांनी लांबणीवर पडणार आहे. तसेच उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विकासकामांना खोडा बसणार आहे. पिण्याचे पाणी प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर पडणार असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी दोन महिने थांबवावे लागणार आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीची आचासंहिता जारी झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होणार आहे. महापालिकेची अर्थसंकल्प २० फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीसमोर मांडला जातो. त्यानंतर महासभेची मंजुरी मिळून ३१ मार्चपूर्वी त्यांची अंमलबजावणी केली जाते. आचासंहितेमुळे अर्थसंकल्प मंजूर होणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे.
प्रशासकांची बैठक होणार, प्रभाव करणारे निर्णय नाहीत
महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचे अधिकार राज्य शासनाने प्रशासकांना बहाल केले आहेत. त्यानुसार प्रशासकांकडून दर मंगळवारी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची बैठक घेऊन कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या विषयांना मान्यता दिली जात होती; पण आता आचारसंहिता असल्याने स्थायी समितीची बैठकीत अवलोकनाचे विषय होणार आहे.
विकासकामे आणि जनसंवादही थांबणार
आचारसंहितेत जनतेवर प्रभाव पडेल, असे निर्णय घेता येणार नाहीत. महिन्यातून दोनवेळा होणारी जनसंवाद सभाही बंद होईल. तसेच नवीन विकासकामांचे विषय थांबणार आहेत. जलशुद्धीकरण केंद्र आणि निघोजे बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोनही प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते नोव्हेंबरअखेर होणार होते. मात्र, त्यावेळी गुजरात निवडणूक असल्याने वेळ मिळाला नाही. त्यामुळे उद्घाटन रखडले होते.
पिण्याच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागणार?
महापालिकेच्या वतीने तयार झालेले प्रकल्प उद्घाटनाशिवाय जनतेसाठी खुले केलेले नाहीत. त्यात तारागंण प्रकल्प, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, शहरातील विविध चौकातील शिल्प, मोशी अग्निशमन केंद्र, इंद्रायणीनगर उद्यान व विरंगुळा केंद्राचे उद्घाटन रखडले आहे. तसेच अमृत प्रकल्पातील एसटीपी प्रकल्पाचेही भूमिपूजन राहिले होते. आता आचारसंहिता लागल्याने पुढील दोन महिने उद्घाटन करता येणार नाही. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.