पिंपरी :चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. भाजप, महाविकास आघाडी यांच्यासोबतच अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले आहे. शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी फक्त ५ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामध्ये चार अपक्ष तर एक संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण कदम यांचा समावेश आहे. त्यामुळे आता २८ जण निवडणूक लढवणार आहेत.
गुरूवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता ३१ जानेवारीपासून सुरूवात झाली होती. विहित मुदतीत ७ फेब्रुवारीपर्यंत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. बुधवारी अर्जांची छाननी केल्यानंतर ४० उमेदवारांपैकी ७ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे. त्यानंतर ३३ उमेदवार मैदानात होते. शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 5 जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता विधानसभेच्या मैदानात 28 उमेदवार आहेत.