पिंपरी : मी इथला भाई आहे, रस्त्यावर वाहन लावण्यासाठी मला हप्ता द्यावा लागेल. असे सांगत तेरा जणांच्या टोळक्याने ३१ डिसेंबरच्या रात्री चिंचवड मधील मोहननगर मध्ये धुडगूस घातला. कोयत्याचा धाक दाखवत परिसरात दहशत केली. तसेच नागरिकांना मारहाण करीत रिक्षा आणि मोटारकारची तोडफोड केली. रात्री साडेदहा ते सव्वाबारा या वेळेत त्यांचा गोंधळ सुरु होता.
या प्रकरणी चौघांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दीपक गिरी, युवराज काळे, आशिष गोरखा, ऋषिकेश शिंदे, बाळासाहेब गवळी, प्रमोद बनगर, रोहित देशमुख, आकाश गायकवाड, अक्षय लोंढे, घन:श्याम साळुंखे, आशिष कांबळे, अरविंद उर्फ सोन्या काळे, करण ससाने, सुबोध ढवळे व त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी पोलिसांनी या टोळक्याला अटक केली. संतराम अर्जुन जगताप (वय ५१), राहुल बबन अलंकार (वय ३४), बापू अण्णा अलंकार (वय ६०, सर्व रा. मोहननगर, चिंचवड) आणि पप्पूलाल सय्यद शेख (वय ४५, अलंकार कॉर्नर, मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
संतराम जगताप मोहननगर येथील मोकळ्या जागेत मोटारकार लावण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना अडविले. तू मोहन नगरमध्ये राहतो आणि सार्वजनिक रस्त्यावर गाडी लावतो. आम्ही इथले दादा आहोत आम्हाला हप्ता देत नाहीस. असे म्हणून कोयत्याने गाडीच्या काचा फोडल्या. तसेच, जगताप यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी राहुल अलंकार याला मोहननगरमधील बी. जी. स्टील कॉर्पोरेशन समोरील सार्वजनिक रस्त्यावर अडविले. तू शाळेची गाडी चालवतो. पैसे कमावतो. आम्हाला हप्ता का देत नाही असे म्हणत धक्काबुक्की केली. खिशातील मोबाईल काढून घेतला. तसेच रोख हजार रुपये काढून कोयत्याने गाडीच्या काचा फोडल्याची तक्रार अलंकार यांनी दिली..