पिंपरी : लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली. प्रत्यक्षदर्शींकडून अपघातामागील खºया कारणाचा उलगडा झाला. बुधवारी चिंचवड येथे घडलेल्या अपघाताची शहरात सर्वत्र चर्चा आहे.चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल चौकातून रेवान्ना अश्रुबा कोपनर (वय ३५, रा. चोपडेवाडी, बीड) हा ट्रक घेऊन जात होता. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून त्याने सिग्नल तोडला. या वेळी वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो तेथे थांबला नाही. त्याने ट्रक तसाच पुढे नेला. वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र त्यांना न जुमानता तो चपळाईने निघून जाऊ लागला. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने रस्त्यातच ट्रक थांबवला. खाली उतरला. काही अंतर पुढे पायी जात असतानाच, ट्रकला हॅण्डब्रेक न लावल्यामुळे ट्रक आपोआप उताराने पुढे जाऊ लागला. ट्रक तसाच उताराने खाली आल्यास दुर्घटना घडू शकते, हे लक्षात येताच त्याने धावपळ केली. चालत्या ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ट्रकमध्ये चढण्यापूर्वीच ट्रक दुभाजकाला धडकला. ट्रक थांबविण्यासाठी धावपळ करीत असताना, दुभाजकाला धडकून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याचा डावा पाय निकामी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिंचवड: कारवाईला घाबरून पळणे बेतले पायावर, वाहतूक नियम मोडणा-या ट्रकचालकाचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 6:32 AM