पिंपरी :वंचित बहुजन आघाडीनेचिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितच्या राज्य कार्यकारिणीत एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभी राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे.
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचितचा पाठिंबा मिळावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्याकडे केले होती. त्यानुसार राज्य कार्यकारिणीत निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘चिंचवडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस पाठिंबा दिला. त्यांनी चांगली मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते होते. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी, असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही. त्यामुळे राज्य कार्यकारिणीने एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.’’
‘‘पाठिंबा दिल्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो. मागील निवडणुकीतही त्यांनी मला पाठिंबा दिला होता. वंचितने पाठिंबा दिल्याने माझे मनोबल उंचावले आहे. वंचितचा पाठिंबा, चिंचवडच्या जनतेचे आशीर्वाद या जोरावर मी नक्कीच विजयी होईल.’’
- राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार.