पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदान केंद्र स्तरावरील अधिकारी ‘हाऊस टू हाऊस’ सर्वेक्षण करत आहेत. ५ लाख ७९ हजार मतदारांपैकी आतापर्यंत ३ लाख ६५ हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. स्थलांतरित, ज्या मतदारांचे फोटो ब्लॅक अँड व्हाईट किंवा अस्पष्ट आहेत, अशा मतदारांचे नवीन रंगीत फोटो अपलोड करण्यात येत आहेत. नागरिकांनी स्थलांतरित, मृृत झालेल्या मतदारांची माहिती बीएलओंना देऊन सहकार्य करावे, मतदारांच्या सर्वेक्षणात चिंचवड विधानसभा मतदारसंघ आघाडीवर असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.
मतदार पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत १ जून ते १६ ऑक्टोबर या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग अथवा भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा व मतदान केंद्रांच्या सीमांच्या पुनर्रचना करण्यासाठी कालबद्ध योजना आखली आहे.
पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक-
२१ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर : मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच अस्पष्ट, अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे.
३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर : नमुना १ ते ८ तयार करणे, १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे.
१७ ऑक्टोबर : एकत्रित प्रारूप यादी तयार करणे.
१७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर : दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
२६ डिसेंबर : दावे व हरकती निकालात काढणे.
१ जानेवारी २०२४ : अंतिम यादी प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटा बेस अपडेट करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे
५ जानेवारी २०२४ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.