चिंचवड : वारंवार खंडित होणाºया विद्युतपुरवठ्यामुळे चिंचवडमधील नागरिक संतप्त झाले आहेत. महावितरण कंपनीच्या अनियोजित कारभारामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाºया कामांकडे दुर्लक्ष केल्याने आणि ती कामे प्रलंबित राहिल्याने तांत्रिक अडचणी येत आहे. महावितरण कंपनीच्या या कारभाराबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत.चिंचवडमधील विविध भागांत नियमित वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत. महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून याबाबत योग्य नियोजन होत नसल्याने अडचणी येत आहेत. चिंचवडमधील बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, प्रेमलोक पार्क, इंदिरानगर, उद्योगनगर या भागांत वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रात्री- अपरात्री विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.महावितरण कंपनीशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होत नाही. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी भेटत नाहीत. ‘साईड व्हिजिट’साठी अधिकारी गेले असल्याचे सांगितले जाते. उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. वीज बिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना विलंब झाल्यास विद्युतपुरवठा बंद करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारीतत्पर असतात.
खंडित वीजपुरवठ्याने चिंचवडकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:02 AM