पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची, नेत्यांच्या प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरली. रविवारी २८ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. या पोटनिवडणुकीत वाढलेली टक्केवारी, आयटीयन्सची अनास्था आणि दुपारी तीन सहा या वेळेत झालेला ‘लक्ष्मीदर्शना’चा खेळ हा कुणाच्या पथ्यावर पडणार हे २ मार्चला समजणार आहे. लक्ष्मीदर्शनाचा फायदा कोण उचलणार? धनशक्ती श्रेष्ठ की जनशक्ती श्रेष्ठ हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. एका मतदार संघाची ही पोटनिवडणूक नव्हती तर राज्यातील सत्तासंघर्ष आणि सत्तावर्चस्वाची प्रचिती देणारी निवडणूक होती. महायुती आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. महायुतीचे चाळीस आणि महाविकास आघाडीचे २० हून अधिक स्टार प्रचारक, राज्यातील आमदार खासदार, मंत्री, माजी मंत्री या मतदार संघात तळ ठोकून होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येते.
भाजपा महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत दिसून आली. एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदारांपैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी असे एकूण ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले. टक्केवारी वाढली असली तरी ती कोणाच्या पथ्यावर पडणार आहे.
मुद्द्यांपासून भरकटली
चिंचवडची निवडणूक ही भावनिक पातळीवर लढली गेली. मात्र, महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराचे भांडवल करण्यात आणि वातावरण निर्मिती करण्यात महाविकास आघाडी कमी पडली. मुद्द्यांपासून शहरातील पाणी, आरोग्य, शिक्षण, भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामे, शास्ती मुद्द्यांवर तसेच मूलभूत प्रश्नांपासून ही निवडणूक दूर गेल्याचे दिसून आले. काही मुद्दे तर भाजपने खोडून काढले. तर विकासाची निवडणूक भावनेवर आणण्यात भाजपने यश मिळविल्याचे दिसून येते. वातावरण निर्माण करण्यात दोन्ही पक्ष पुढे होते. तर अपक्षांनीही सत्ताधारी आणि विरोधकांना लक्ष्य करून निवडणुकीत आपले स्थान कायम केले.