पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीत मुदत संपलेल्या आठ जागांसाठी आज निवड झाली. त्यामध्ये भाजपाच्या राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, अपक्ष झामाबाई बारणे यांची निवड जाहीर झाली आहे. त्यात चिंचवड आणि भोसरी आमदार समर्थकांची वर्णी लागली आहे. अध्यक्षपदासाठी भोसरीचे राजेंद्र लांडगे की चिंचवडचे शीतल शिंदे यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
महापलिकेची तहकूब सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. महापालिकेच्या स्थायी समितीत सोळा सदस्य असून, त्यात भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना एक आणि अपक्षांचा एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाचे सर्वाधिक दहा सदस्य स्थायीत आहेत. दरवर्षी आठ सदस्य समितीतून बाहेर पडतात. गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपाच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपणार आहे. त्यांच्या जागी या नवीन सदस्यांची नियुक्ती होणार होती. आजच्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाच्या पाच सदस्यांची, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची, गटनेते राहुल कलाटे यांनी शिवसेनेच्या एक तर अपक्षाचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिले. त्यानंतर संबंधितांची नावे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी वाचून दाखविली. त्यानंतर स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर जाधव यांनी केली. रिक्त झालेल्या जागांवर भाजपाच्या राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, अपक्ष झामाबाई बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची निवड झाली आहे.अध्यक्षपदासाठी चुरससदस्य निवडीनंतर आता सभापतिपदी नियुक्तीचे वेध लागले आहेत. सध्याचे सभापती पद हे चिंचवडला होते. त्यामुळे नवीन सभापती भोसरीचा की चिंचवडचा याबाबत उत्सुकता आहे. सभापती पदासाठी जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे, आरती चौंधे यांच्या नावाची चर्चा आहे. तर दरवर्षी सर्व सदस्यांचे राजीनामे घेऊन नवीन सदस्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबिले होते. मात्र, यावर्षी उर्वरित सदस्यांबाबत भाजपाने धोरण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे गेल्या समितीतील सदस्य की नवीन चेहऱ्यास संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. आमदार समर्थक असणार की जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा विचार करणार याबाबत उत्सुकता आहे.‘लोकमत’चे वृत्त खरेलोकमतने शुक्रवारच्या अंकात स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले असून, आमदार समर्थकांची निवड समितीत अधिक आहे. जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, आरती चौंधे, झामा बारणे यांची निवड होणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते.