पिंपरी-चिंचवड (वाकड) : वारंवार अाणि तासंतास खंडित होणारी वीज, वेळेत दखल न घेणारे व नागरिकांच्या तक्रारींना अरेरावीची भाषा करून उद्धट वागणून देणाऱ्या ताथवडे येथील महावितरण उप विभागीय कार्यालयाला रविवारी ( दि.२६ ) सकाळी अकराच्या सुमारास विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठोकुन कामकाज बंद पाडले. यावेळी महावितरण सनियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय मरकड, सदस्या भारती विनोदे, मधुकर बच्चे, देविदास शिंदे, संकेत मरकड, तेजस चौरे,युवराज शिंदेआदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या भागातील वीज समस्या गंभीर बनली असून नागरिकांना वारंवार त्याचा सामना करावा लागत आहे. तसेच कर्मचाऱ्याकडून तक्रारदार नागरिकांना उद्धट वागणूक मिळते तसेच तक्रारींची दखल घेतली जात नाही. अनेकदा फोन खनानुन देखील ते उचलले जात नाहीत अथवा उचलले तर समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. होईल, बघू, करू अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात अशा असंख्य तक्रारी समितीकडे आल्या होत्या. समितीने याची पडताळणी करण्यासाठी रविवारी सकाळी थेरगाव परिसरात विद्युत पुरवठा होत नसल्याची तक्रार केली. यावेळी तेथील कर्मचाऱ्याने समितीने सदस्याशी उद्धट वर्तन करीत समधनाकारक उत्तरे दिली नाहीत.
त्यामुळे समितीच्या सदस्यांनी थेट महावितरण कार्यालय गाठून पाहणी केली असता त्याठिकाणी महावितरणचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. नागरिकांच्या तक्रारीसाठी नेमलेला कर्मचारी तक्रारींची कागदोपत्री नोंद घेत नसल्याचे आढळले. तसेच तेथील मस्टर वर एकाही तक्रारीची नोंद नसल्याचे निदर्शनास आले याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्याने तक्रार मस्टरमध्ये नोंदवत नसल्याचे संगीतले. त्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून थेट कार्यालया टाळे ठोकले. टाळे ठोकल्यानंतरही तब्बल तीन तास महावितरणचा एकही अधिकारी त्या ठिकाणी फिरकला नाही. वाकड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन समितीच्या सदस्यांची समजूत घालून टाळे उघडुन कामकाज पूर्ववत केले.
शहानिशा करून तक्रार निवारण करण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून त्या तुलनेने परिसर खूप मोठा आहे त्यामुळे काही वेळा इच्छा असूनही वेळेत पोहचता येत नाही मात्र तरीसुद्धा तक्रारी वेळेत दूर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सकाळी थेरगाव येथून तक्रार आली त्याठिकाणी आमचा कर्मचारी गेला देखील मात्र तक्रार दिलेल्या व्यक्तीचा योग्य पत्ता आम्हाला देण्यात न आल्याने आम्ही त्याच्याकडे पोहचू शकलो नाही. मात्र यापूढे आणखी उत्तम आणि तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करू. - प्रकाश नाईकवडे (सहायक अभियंते ताथवडे उपविभागीय कार्यालय महावितरण) यापुढे हयगय न करता कारवाई आपल्या शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना मूलभूत असणारी वीज तासनतास खंडित होणं म्हणजे लाजिरवांनी बाब आहे शिवाय तक्रार देणारयाला उद्धट वागणूक देणे हे त्यापेक्षा चुकीचे आहे त्यामुळे फोन उचलण्यास टाळाटाळ करणाऱ्या ताथवडेतील कर्मचाऱ्यावर ज्याप्रमाणे निलंबनाची कारावाई करण्यात आली त्याचप्रमाणे कर्मचारी असो अथवा वरिष्ठ अधिकारी लोकांना योग्य सेवा न दिल्यास आम्ही निलंबनाची कारवाई करनार आहोत.- संजय मरकड (विद्यत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष)