पिंपरी : महापालिकेतील विविध विभागांबाबत नागरिकांना अनेक प्रश्न असतात, त्यासाठी कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी लागते. त्यामध्ये नागरिकांचा पैसा आणि वेळही वाया जातो, हा वेळ वाचवण्यासाठी महापालिकेच्या वतीने सारथीवर ‘चॅट बॉट’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. देशीतील हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिला प्रकल्प असणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांविषयी नागरिकांना विविध प्रश्न असतात. त्याची सोडवणूक करणे अवघड जाते. नागरिकांच्या सोयीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या संकल्पनेतून सारथी प्रणालीवर ‘चॅट बॉट’ ची सुविधा उपबल्ध करून दिली जाणार आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने सारथी हेल्पलाईन सुरू केलेली आहे. नागरिकांची अनेक विभागासंदर्भात विविध प्रश्न असतात. नागरिकांचा वेळ वाचावा, यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. २६ जानेवारीपासून चॅट बॉट ही सुविधा उपबल्ध करून दिली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यावर मराठी आणि इंग्रजीत संवाद साधता येणार आहे. प्रश्न विचारता येणार आहे. प्रश्नांची उत्तरे नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहेत. सुरुवातीला सारथीवर मिळकत कर विभागासाठीचा सेक्शन केला जाणार आहे. त्यानंतर महापालिकेतील सर्व विभागांचा समावेश असणार आहे.’’नागरवस्ती योजनांच्या लाभाची मिळणार माहितीमहापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र, त्याचे अर्ज आणि योजनांची माहिती, अर्जांची स्थिती लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे योजनांचा लाभ घेणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने अॅपद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले,‘चॅट बॉट’ ची सुविधा हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशातील पहिला प्रयोग असणार आहे. तसेच नागरवस्ती विभागासाठी स्वंतत्र अॅप्लिकेशन सुरू केले आहे. त्यामध्ये योजनाची माहिती. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पात्र आणि अपात्र लाभार्थी याची माहिती नागरिकांना मिळणार आहे.
‘चॅट बॉट’ सोडवणार नागरिकांचे प्रश्न; महापालिका पातळीवरील देशातील पहिलाच प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:05 AM