सांगवी : पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक ते पिंपळे गुरव मुख्य बस स्थानकापर्यंत रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रगतिपथावर असून, या रस्त्याने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतूक व्यवस्था जगताप पेट्रोल पंपपासून काशीद नगर येथील रस्त्याने वळवल्यामुळे आधीच रस्ता अरुंद व त्यात येथील शहीद भगतसिंग चौक येथील वळण लहान असल्याकारणाने वाहतूक कोंडीच्या समस्येने येथील वाहनचालक व रहिवासी त्रस्त आहेत. लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्ते लहान व त्यात पीएमपी बस, ट्रक आदी मोठे वाहन, तसेच नोकरी व उद्योग व्यवसायानिमित्ताने जाणाºया वाहनधारकांमुळे येथे वाहतूक कोंडी दररोजची झाली असून, त्यामुळे तासन्तास वाहतूक खोळंबून राहतात. येथील नागरिक यामुळे त्रासले असून लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक काशीद, तसेच आशिष जाधव व शंकर जगताप यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वाहतूकप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत पिंपळे गुरव येथील कोंडी सोडवावी अशी मागणी करण्यात येत आहे.खोळंबा : एकेरी मार्गचिंचवड, पिंपरीकडून पिंपळे सौदागरमार्गे येणाºया पीएमपी बस, तसेच या भागातील रहिवासी पिंपळे गुरव मार्गे दापोडी, सांगवी ह्या रस्त्याने जात येत असतात व काही महिन्यांपासून येथील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू असून काशीदनगर मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या वाढली असून अरुंद रस्त्यांमुळे वाहनांचा खोळंबा होत आहे. परिणामी वाहतुककोंडी होऊन अपघाताची शक्यता वाढली असून, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.