पिंपरी : आॅर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री हॉटेल, लॉजवर तरुणींना घेऊन जाणारी वाहने शहरात वावरताना दिसून येतात. पोलिसांच्या तपासणी मोहिमेत ही वाहने हाती लागत नाहीत. रात्री ११ नंतर हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश असताना, महिला व तरुणींना घेऊन जाणारी वाहने मात्र रात्री ११ नंतरच दिसून येतात. वेश्याव्यवसायासाठी सर्रासपणे तरुणींची वाहतूक केली जात असून, पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पिंपरी-चिंचवड व परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय फोफावला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हॉटेल, लॉजवर तरुणींना नेले जाते. तरुणींची वाहतूक करण्यासाठी वापरात येणारी वाहने पोलिसांच्या आणि इतरांच्या सहज लक्षात येऊ नयेत, म्हणून तरुणींची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नामी शक्कल लढवली आहे. वाहनाच्या काचेवर आॅर्केस्ट्राची पाटी लावली जाते. आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम संपवून रात्री उशिरा कलाकारांना घेऊन जात असल्याचे भासविले जाते. त्या वाहनात कलाकार नव्हे,तर वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणी असतात. आॅर्केस्ट्राचे नाव काचेवर लिहिलेली ही वाहने तरुणींना घेण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जातात. रात्री ११ नंतर त्यांना त्यांच्या घराजवळून वाहन सुविधा उपलब्ध करून दिली जाते.ज्या हॉटेलमध्ये ग्राहक थांबले आहेत. त्या हॉटेलपर्यंत तरुणींना वाहनातून नेले जाते. पोलीस नाकाबंदी करतात, वाहनांची तपासणी करतात, त्या वेळी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही? पोलीस जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करतात की काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलांमध्ये अद्याप कोठेही आॅर्केस्ट्रा होत नाही. आॅर्केस्ट्रा असे लिहिलेली वाहने शहरातच विविध ठिकाणी घिरट्या मारत असतात. या वाहनांमधून ने-आण होणाऱ्या तरुणीसुद्धा शहरातच वास्तव्यास आहेत. रात्री घराबाहेर पडणाऱ्या या तरुणी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येतात. (प्रतिनिधी)
शहरात तरूणींचे ‘एस्कॉर्ट’
By admin | Published: December 07, 2015 12:04 AM