खडकी : येथील मुख्य बाजारपेठेत मोकाट सोडलेल्या जनावरांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे़ संपूर्ण बाजारात प्रत्येक ठिकाणी गाई, म्हशी, शेळ्या सर्रासपणे ठाण मांडून बसलेले दिसत आहेत. काही ठिकाणी तर गर्दीच्या वेळेस गाई, म्हशी कळप करून गर्दीतून पळत सुटतात़ अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी यांना गाई, म्हशी धडक देऊन जखमी केल्याच्या अनेक घटना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये घडलेल्या आहेत़ मात्र खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य व तत्सम विभागाने याची जराही दखल घेतली नाही़ त्यामुळे खडकी बाजारात गाई, म्हशी यांची चांगलीच धास्ती नागरिकांनी घेतली आहे़ यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी खडकीकरांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे केली आहे.खडकी बाजारात गवळीवाडा व कसाई मोहोल्ला येथील जनावरे अनेकदा मालकांनी रस्त्यावर सोडलेली असतात, ही सोडलेली जनावरे वाड्यावस्तीत जाऊन रहिवाशांचे नुकसान ही करीत असतात़ मात्र जनावरे कोणाची आहेत याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही़ त्यामुळे तक्रार करायची कोणाकडे, असा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशांना पडत आहे़ त्यामुळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने बेवारस जनावरे उचलून कोंडवाड्यात दाखल करावी, अशी मागणी खडकीतील रहिवासी करीत आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कोंडवाडा नेहमी रिकामा पडलेला असतो़ क्वचित कधीतरी एखादी बकरी किंवा गाई नावापुरता धरून आणून कारवाई केल्याचा आव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी करीत असतात़ प्रत्यक्षात मात्र पूर्ण खडकीत मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे.खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे सुसज्ज कोंडवाडा आहे. मात्र बोर्डाकडे गुरेवाहक गाडी नसल्यामुळे कारवाई करण्यात येत नाही़ खडकीतील मोकाट जनावरे उचलण्याकरिता लवकरच औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून गुरेवाहक गाडी आणून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, व बोपोडी येथील पुणे महापालिका हद्दीतील मोकाट जनावरे संयुक्त कारवाई करून कोंडवाड्यात सोडण्यात येईल.- बी. एस. नाईक,आरोग्य अधीक्षक,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड
मोकाट जनावरांच्या उच्छादाने खडकी बाजारात नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 1:03 AM