रोशन मोरे
पिंपरी : एक नेता...एक पक्ष अन् एक दसरा मेळावा, अशी ओळख असणाऱ्या शिवसेनेत तीन महिन्यांपूर्वी फूट पडली. न्यायालयाकडून शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे प्रथमच शिवसेनेचे दोन ठिकाणी दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यात गर्दी जमवून, शक्तिप्रदर्शन करून आपलीच शिवसेना खरी असा दावा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांची शहरातून सर्वाधिक शिवसेना कार्यकर्ते आपल्या गटाच्या मेळाव्यासाठी मुंबईला नेण्यासाठी धावपळ सुरू आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी दरवर्षी दसऱ्याला शिवसैनिक न चुकता शिवाजी पार्कवर जातात. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरू ठेवली; मात्र यंदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या एका गटाने बंडखोरी केली. एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने आपला पक्षच मूळ शिवसेना आहे, असा दावा केला. तसेच दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क येथे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानात अशा दोन ठिकाणी शिवसेनेचे दोन ठिकाणी दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे खरा शिवसेना कार्यकर्ता आपल्या सोबत आहे, हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून शिवसेनेच्या प्रत्येक जिल्ह्यातील, शहरातील पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त शिवसेना कार्यकर्ते घेऊन मुंबईला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही गटाचे पदाधिकारी मागील १५ दिवसांपासून कार्यकर्त्यांच्या जमावाजमवीच्या नियोजनात आहेत.
ठाकरे गटाकडून ३० बस...
ठाकरे गटाकडून ३० बस व ५० कारचे नियोजन आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून या ३० बसची सोय शिवसेना कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली आहे. शिवाय खासगी ५० चारचाकी वाहनांचेदेखील बुकिंग केले आहे. शिवाय काही कार्यकर्ते स्वत:च्या चारचाकी वाहनांतून इतरांना सोबत घेऊन जाणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
शिंदे गटाकडून ५० बस
पिंपरी-चिंचवड व मावळमधून तब्बल पाच हजार शिवसेना कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी तब्बल ५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय वैयक्तिक आणि भाड्याच्या गाड्या करून काही कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
''पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जाणार आहेत. कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकदेखील या मेळाव्याला येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्याकडून मेळाव्यासंदर्भात विचारणा होत आहे. या दसरा मेळाव्याला शहरातून जाण्यासाठी आम्ही सर्व वाहतूक व्यवस्था केली आहे. - ॲड. सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)''
''खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळाव्याला जाण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून आम्ही तयारी करत आहोत. मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते मेळाव्यासाठी येणार आहेत. या मेळाव्यातून खऱ्या शिवसेनेची ताकद आम्ही सर्वांना दाखवून देऊ. - बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)''