पुणे : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)च्या दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केवळ बोर्डस्तरावर घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी गांभीर्याने अभ्यास करतील. परंतु, विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण येऊ नये याबाबत शासनाने काळजी घ्यावी, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत.गेल्या काही दिवसांत सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम दर्जेदार असल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात, असा काहींचा समज आहे. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये दहावीची परीक्षा शाळा स्तरावर आणि बोर्ड स्तरावर अशा दोन्ही पद्धतीने घेतली जात होती. विद्यार्थ्यांना दहावीला बोर्डाची परीक्षा देण्याची वेळ येऊ नये, या हेतूनेही काही पालक विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये दाखल करत होते. मात्र, सीबीएसईच्या २0१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या परीक्षा केवळ बोर्डस्तरावरच घेतल्या जाणार आहेत. तसेच पाचवी आणि आठवीच्या परीक्षाही कोणत्या पद्धतीने घ्यावात याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाकडे देण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली आहे.आर्मी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या बिनिता पुनेकर म्हणाल्या, दहावीच्या परीक्षा बोर्डस्तरावर घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे दहावीतील विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. विद्यार्थी वर्षभर गांभीर्याने अभ्यास करत नव्हते. विद्यार्थी अकरावी, बारावीमध्ये आल्यावरच काळजीपूर्वक अभ्यास करत होते, आता त्यात सुधारणा होईल.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे म्हणाले, प्रामुख्याने नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी दहावीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा देत होते. खासगी संस्थांमध्ये प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी शाळास्तरावरील परीक्षा देणे पसंत करत होते. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येऊू शकतो. तसेच दहावीचा निकालही कमी होऊ शकतो.इंडिपेंडंट इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे राजेंद्र सिंग म्हणाले, विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये, या उद्देशाने सीसीई पद्धतीने विद्यार्थ्यांचे वर्षभर मूल्यांकन केले जात होते. त्यामुळे विद्यार्थी मुक्त वातावरणात ज्ञानार्जन करत होते. मात्र, बोर्डाची परीक्षा या विचाराने विद्यार्थी अभ्यासाचा ताण घेतील, त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याचा विचार करून परीक्षांचे नियोजन करावे.मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे-पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शासनाने हा निर्णय घेतला असेल तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये, याचाही विचार केला जावा.(प्रतिनिधी)
दहावीच्या परीक्षा केवळ बोर्डस्तरावर
By admin | Published: November 16, 2016 3:07 AM