मंगेश पांडेपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या प्रसारासाठी लावलेल्या फलकांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.केंद्र शासनामार्फत ४ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ केले जाणार आहे. या अभियानात पिंपरी-चिंचवड शहरही सहभागी झाले आहे. यामध्ये माहिती, शिक्षण व संवाद, तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया अंतर्गत सर्वेक्षणविषयक नागरिकांना एकूण सात प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यास गुणांकन असेल. प्रश्नांची योग्य व अपेक्षित उत्तरे नागरिकांकडून मिळाल्यास शहरास गुणांकन मिळणार असून, त्यानुसार स्वच्छ सर्वेक्षणात अधिकाधिक गुण मिळणार आहेत.त्यानुसार या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने या सर्वेक्षणाबाबतचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याबाबतच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. यासाठी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहेत.दरम्यान, फ्लेक्स व बॅनर लावताना महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी नियमाप्रमाणे फ्लेक्स उभारणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेने या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी अनधिकृतरीत्या फ्लेक्स व बॅनर उभारल्याचे दिसून येत आहे. चौकात, रस्त्यावर, उड्डाणपुलाच्या खांबांना, बसथांब्यांना फ्लेक्स लावल्याचे दिसून येत आहे.केवळ स्वच्छ सर्वेक्षणाचेच नाही, तर पवनाथडी जत्रा, मिळकतकर भरण्याबाबतचे आवाहन, विविध स्पर्धांसह महापालिकेच्या विविध उपक्रमांचे फलक अशाप्रकारे अनधिकृतरीत्या ठिकठिकाणी उभारल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सामान्य नागरिकांना असणारा नियम महापालिकेला नाही का, असाही सवाल नागरिक उपस्थित करतात.>महापालिकेतर्फेच उभारले अनिधकृत फलकनिगडीतील उड्डाणपूल, आकुर्डीतील बजाज आॅटोसमोरील भुयारी मार्ग, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत फलक उभारल्याचे पाहायला मिळत आहेत. अनेकदा काही फलक तर दृष्टीसही पडत नाहीत, अशा ठिकाणी उभारलेले असतात.>शहरातील नागरिकांना अभियानाबाबत माहिती मिळावी यासाठी ठिकठिकाणी फलक उभारले आहेत. या फलकांमुळे कसलेही विद्रूपीकरण होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच हे फलक महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच उभारावेत, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.- दिलीप गावडे, सह आयुक्त, पिं. चिं. महापालिका
स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून शहराच्या विद्रूपीकरणात भर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:19 AM