पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडपोलिस ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई केली. पिंपरी, वाकड, निगडी पोलिस ठाण्यातील तीन टोळ्यांवर संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सुरू केलेल्या या ‘साफसफाई’मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
पिंपरी परिसरातील गुन्हेगार सुरज उत्तम किरवले (टोळी प्रमुख - २४, रा. घरकुल, चिखली), यश ऊर्फ पाशा कैलास भोसले (२१, रा. रिव्हर रोड, पिंपरी), अविनाश प्रकाश माने (२२, रा. बौध्दनगर, पिंपरी), गणेश जमदाडे (रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरूध्द खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, अग्निशस्त्रे बाळगणे असे सहा गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात या टोळीवर ‘मोका’ लावण्यात आला.
वाकड परिसरातील गुन्हेगार रोहीत मोहन खताळ (टोळी प्रमुख - २१, रा. थेरगाव), साहील हानीफ पटेल (२१, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), ऋषीकेश हरी आटोळे (२१, रा. शिवदर्शन कॉलनी, थेरगाव), शुभग चंद्रकांत पांचाळ (२३, रा. अष्टविनायक कॉलनी, काळेवाडी), अनिकेत अनिल पवार (२७, रा. पवारनगर, थेरगाव), प्रितम सुनील भोसले (२०, रा. आदर्शनगर, काळेवाडी), शिवशंकर शामराव जिरगे (२२, रा. दत्तनगर, थेरगाव), सुमित सिद्राम माने (२३, रा. शिवराजनगर, रहाटणी), गणेश बबन खारे (२६, रा. दगडू पाटीलनगर, थेरगाव), अजय भीम दुधभाते (२२, रा. पडवळनगर, थेरगाव), मुन्ना एकनाथ वैरागर (२१, रा. पवारनगर, थेरगाव), कैवल्य दिनेश जाधवर (१९, रा. उंड्री, हडपसर) यांच्या विरूध्द खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यारे, अग्निशस्त्रे बाळगणे असे १९ गुन्हे बीड, अहमदनगर आणि पिंपरी-चिंचवड येथे दाखल आहेत. वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांच्यावर ‘मोका’ची कारवाई केली.
निगडी परिसरातील गुन्हेगार अमन शंकर पुजारी (टोळी प्रमुख - वय २२), शिवम सुनील दुबे (२१), रत्ना मिठाईलाल बरुड (३६, तिघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांच्या विरोधात कट करून खून करणे, दरोडा, दुखापत, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या घातक हत्यारे बाळगणे असे सहा गुन्हे पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत. निगडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात त्यांच्यावर ‘मोका’ची कारवाई केली.
गुन्हेगारांच्या या तिन्ही टोळ्यांमधील सर्व संशयितांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस ठाण्यांकडून या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त कार्यालयात सादर झाला. या टाेळ्यांवर कारवाईबाबत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश दिले. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यानंतर या गुन्हेगारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई झाली.