पिंपळे गुरव : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मीडिअम स्कूल, तसेच भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती स्वच्छता अभियान, प्रतिमापूजन, विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे अशा विविध माध्यमांतून साजरी करण्यात आली.
सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते. प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसराची स्वच्छता केली. परिसरातील रस्त्यावरील कचरा गोळा करीत विद्यार्थ्यांनी साफसफाई केली. महात्मा गांधी यांची तीन शहाणी माकडे विद्यार्थ्यांनी या वेळी साकारली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गीत गायले. शिक्षिका कविता मुदलीयार यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या,‘‘महात्मा गांधी हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व होऊन गेले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.’’ओम साई फाउंडेशनचे संजय मराठे यांच्या मित्र परिवारातर्फे व्यसन मुक्तीची शपथ घेण्यात आली. अहिंसा गौरव पुरस्कार ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, डॉ. मदन कोठुळे, नरेश आनंद, केतन मेश्राम यांना देण्यात आला. ओम साई फाउंडेशनचे कार्यकर्ते तौफिक सय्यद, नीलेश मताने, विजयसिंह भोसले, प्रल्हाद बोरकर, रवींद्र बाईत, रामचंद्र गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. दीपक माकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण भोसले यांनी आभार मानले.