सांगवी : महापालिकेच्या सांगवी परिसरातील स्वच्छतागृहांची आरोग्य विभाग ‘ह’ प्रभागातर्फे अत्याधुनिक यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या कामामुळे समाधान व्यक्त केले आहे. महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी परिसरातील कुंभारवाडा, चंद्रमणीनगर व अहल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाटावर सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत.नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातही विविध ठिकाणी महापालिकेची एकूण १३२८ स्वच्छतागृहे आहेत. यात महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. या स्वच्छतागृहांत आणि परिसरात अस्वच्छता होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून ‘ह’ प्रभागासाठी ‘मॅकेनिझम’ यंत्रणा वापरण्यात येत आहे. सात गाड्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक पद्धतीने स्वच्छता होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही आरोग्य व स्वस्वच्छतेची काळजी घेतली जाणार आहे. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी अजय जाधव यांच्या आदेशानुसार सांगवी ‘ह’ प्रभाग अधिकारी आशा राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहायक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, मुकादम बळीराम बगाडे, संतोष कदम, अंकुश गव्हारे, नारायण शितोळे, सफाई कर्मचारी शरण लोंढे, सुरेश लोंढे आदी कर्मचारी सफाई मोहिमेत सहभागी झाले होते.महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याचा व मूलभूत सुविधा देण्यासाठी त्यासोबत पालिका कर्मचारी यांचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न केले जातात. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून स्वच्छतागृहांची स्वच्छता प्रभागात दररोज होणार असून, त्यासोबत नागरिकांनीही महापालिकेच्या आरोग्य अभियानात सहकार्य करावे.- आशा राऊत, क्षेत्रीय अधिकारी, ‘ह’ प्रभाग, महापालिका
यांत्रिकी पद्धतीने होणार स्वच्छतागृहांची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 2:15 AM