पिंपरी : त्वरित प्रभावाने झालेली बदली रद्द करण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिकाने उपोषणाचा इशारा दिला. तसेच आयुक्तालयात मनमानी कारभार सुरू असल्याचाही आरोप या लिपिकाने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत लिपिकाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना पत्र दिले आहे.
गणेश रामदास सरोदे, असे उपोषणाचा इशारा दिलेल्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाचे नाव आहे. ‘माझी ४ जुलै २०२२ रोजी पोलीस अधिकारी आस्थापना १ ते लेखा शाखा येथे त्वरित प्रभावाने पुढील आदेशापर्यंत बदली करण्यात आली. या बदलीला जवळपास १० महिने कालावधी झाला. अद्यापर्यंत माझी बदली रद्द करून आस्थापना - १ चे आदेश पारित करण्यात आले नाहीत. आयुक्तालयात चाललेल्या मनमानी कारभारा विरुध्द मी पिंपरी -चिंचवड येथील मुख्य प्रवेशव्दाराजळ उपोषणास बसत आहे. याबाबतची कारणे मी या सोबत सादर करत आहे. तरी माझ्यावर झालेला अन्याय दूर करून अस्थापना १ चे आदेश होण्यास विनंती आहे, असे सरोदे यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे.
गणेश सरोदे याबाबत म्हणाले, मी पत्र दिल्यानंतर वरिष्ठांनी मला थांबवले आहे. त्यामुळे हे उपाेषण स्थगित केले आहे. मात्र, माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मला न्यायाची प्रतीक्षा आहे.