पिंपरी : एक मनोरुग्ण महावितरण कंपनीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या (टाॅवर) मनोऱ्यावर चढला. त्यानंतर वीजतारांना पकडून लोंबकळला. त्यात हात निसटून ५० फूट उंचीवरून तो पडला. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर असल्याने तो गवत असलेल्या चिखलात पडला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे गुरुवारी (दि. २९) दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ‘शोले’ या हिंदी चित्रपटातील पाण्याच्या टाकीवर चढलेला ‘विरू’ आणि त्याचे डायलाॅग पुन्हा चर्चेत आले.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाक्याजवळ महावितरण कंपनीचा उच्चदाब विद्युत वाहिनीचा टाॅवर आहे. मनोरुग्ण असलेला एक ३० वर्षीय तरुण गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास या टाॅवरवर चढला. ही बाब तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर काॅल केला. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस उपिनिरीक्षक संदेश इंगळे आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी अग्निशामक विभाग व महावितरण कंपनीला माहिती दिली. त्यानुसार वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे या टावरवरील वीजतारांमध्ये वीजप्रवाह नव्हता.
दरम्यान, मनोरुग्ण तरुण टावरच्या टोकावर चढला. त्यानंतर सर्वात वरच्या वीजतारेला पकडून तो लोंबकळू लागला. तारांमध्ये वीजप्रवाह नसल्याने त्याला विजेचा धक्का बसला नाही. त्यानंतर तारेला धरून तो पुढे सरकू लागला. यात तो हेलकावत होता. त्याचवेळी हे पाहण्यासाठी टावर जवळ व रस्त्यावर मोठी गर्दी झाली. काही नागरिकांनी मोबाइलमध्ये फोटो तसेच व्हिडिओ रेकाॅर्डिंग केले. मनोरुग्ण तरुण इतक्या उंचीवरून पडल्यास त्याच्या जीवाचे बरे वाईट होईल म्हणून अनेकांकडून चिंता व्यक्त करीत होते.
अन् मनात धस्स झाले...वीजतारेला लोंबकळत असताना हात सुटून मनोरुग्ण तरुण पडला. त्यावेळी गर्दीतील प्रत्येकाच्या मनात धस्स झाले. मात्र, तरुण झाडांच्या फांद्यांवर पडला. त्यानंतर झाडांखाली गवत व चिखलात तो पडला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी धाव घेत तरुणाला तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. या तरुणाला बोलता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तो नेमका कोण आहे, कुठून आला, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.