किवळे : विकासनगर येथील मुख्य रस्ता गेल्या महिन्यांत केबल टाकण्यासाठी खोदण्यात आल्या आहे़ संबंधित रस्ता खोदणे व लगतचे सिमेंट ब्लॉक काढण्याबाबत परवानगी घेतली नसल्याची बाब नागरिकांच्या सतर्कतेने उघड झाली होती. संबंधित कंपनीने सुमारे एक ते दोन फूट रुंदीचा रस्ता खोदला असताना महापालिकेच्या संबंधित विभागाकडून सुमारे पाचशे मीटरहून अधिक लांबीचा चार ते पाच फूट रुंदीचा रस्ता घाईघाईत डांबरीकरण करण्यात येत आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण करताना पेट्रोल पंपाच्या भिंतीलगत असलेल्या गटारीवरही खडी टाकून संबंधित भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून, पावसाळ्यात पावसाचे पाणी कसे जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. केबलसाठी काढलेले सिमेंट ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात आले असून, एका कंपनीच्या चुकीमुळे पैशाचा अपव्यय होत असल्याचे स्पष्ट होत आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गापासून सुरू होणारा विकासनगर मुख्य रस्ता गेल्या महिन्यात केबलसाठी खोदण्यात येत होता. सिमेंट ब्लॉकही काढण्यात येत होते. याबाबत काही नागरिकांनी शंका उपस्थित केली. रस्ता खोदाई करण्याची महापालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचे त्यामुळे उघड झाले होते. त्या वेळी कंपनीने काम बंद करून दोन दिवसांत खोदलेला रस्ता बुजविला होता.घाईत खोदलेल्या भागातील रस्ता व सिमेंट ब्लॉक दुरुस्ती सुरू केली असून, कंपनीने रस्ता फक्त एक दोन फूट रुंदीपर्यंतच खोदलेला असताना उर्वरित भागातील रस्ता सुस्थितीत असताना चार ते पाच फूट रुंदीचा रस्ता मोठी खडी टाकून डांबरीकरण केला जात आहे. खोदलेल्या रस्त्याहून अधिक रुंदीचा सुस्थितीतल रस्ता डांबरीकरण करून पैशांची नासाडी केली जात आहे. याबाबत महापालिकेचे एक अधिकारी म्हणाले, ‘‘खोदलेल्या रस्त्याची रुंदी कमी असून, तेवढाच भाग डांबरीकरण करता येत नाही. त्यामुळे उर्वरित भागात डांबरीकरण सुरू आहे.’’ पेट्रोल पंपाच्या भिंतीला लागून असलेली गटार खडी टाकून बुजवून त्यावर चक्क रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.इतर रस्ते दुरुस्तीकडे काणाडोळा का?किवळेतील नगरसेवक वस्ती ते रावेत रस्ता, किवळे गावठाण येथील बापदेव मंदिर परिसर, सिम्बायोसिस विद्यापीठ आदी भागातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाअभावी दुरवस्था झालेली आहे. असे असताना केबल कंपनीने बेकायदा खोदलेला विकासनगर रस्ता दुरुस्तीची घाई कशासाठी करण्यात येत आहे, याचे गौडबंगाल नक्की काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेची परवानगी न घेताच शहरात खोदकाम केले जाते. त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजनांची मागणी होत आहे.