पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मात्र, अचानक झालेल्या हवामानातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. शहरामध्ये सर्दी, खोकला व थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
कधी थंडी, तर कधी तापमानात वाढ होत आहे. ढगाळ वातावरण होऊन पावसाचा शिडकावाही होत आहे. विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे शहरात विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. परिणामी सर्दी, खोकला यासह थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळात मुले घराबाहेर पडली नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी झाली असून, आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. वातावरणात झालेल्या बदलामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही थंडी-तापाची लक्षणे जाणवत आहेत. परिणामी शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे.
हवामानातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. या काळात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप येत असेल तर तत्काळ रक्त तपासणी करून घ्यावी. आजाराचे वेळीच निदान झाले तर रुग्ण लवकर बरा होतो. ऋतुबदल होत असताना असे संक्रमण सामान्य असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
कमी तापमानाची नोंद
दोन दिवसात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. बुधवारी दुपारी २६ अंश तापमानाची नोंद झाली, तर रात्री १८ अंश तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मंगळवारी २४ अंश तापमान नोंदले होते. गुरुवारी (दि.११) २५ अंश तापमान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शहरामध्ये दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. सर्दी, खोकला व थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घ्यावी. लक्षणे जाणवल्यास तत्काळ रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी