पिंपरी : शैक्षणिक सहल काढण्यासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे सहली आयोजित करतानाही शाळांना अनेकदा विचार करावा लागत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सहलीसाठी केवळ परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा वापर करावा, असे नमूद केले आहे. मात्र, एसटी बसेस वेळेत उपलब्ध होत नसल्याने शाळांची धांदल उडत आहे. यासह सहलींचे नियोजनही कोलमडत आहे.पुण्यातील आबेदा इनामदार महाविद्यालयाने मुरुड-जंजिरा येथे आयोजित केलेल्या सहलीत समुद्रात बुडून १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेच्या सहली काढताना शिक्षण विभागाने नियमावली आखून दिली असून, याबाबतचे परिपत्रकही शिक्षण उपसंचालकांनी ११ फेबु्रवारी २०१६ रोजी प्रसिद्ध केले आहे.या परिपत्रकात सहलीसाठी एसटी बस तसेच अन्य शासकीय मान्यता असलेल्या आरटीओने मान्य केलेल्या वाहनांतूनच सहली घेऊन जाव्यात असे नमूद केले आहे. तर पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या पत्रकात मात्र, सहलीसाठी केवळ परिवहन महामंडळाच्या एसटी बसचाच वापर करावा, असे नमूद केले आहे.दरम्यान, एसटी बसेस उपलब्ध करण्यासाठी शाळांची धांदल उडत असल्याचे दिसून येत आहे. एसटी बससाठी आगार व्यवस्थापनाला संपर्क साधण्यापासून ते बस उपलब्ध होईपर्यंत मोठा कालावधी लागत आहे. सहजासहजी बस उपलब्ध होत नाही. यामध्ये शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापकांसह, शिक्षकांची दमछाक होत आहे. एसटी बसने सहल नेण्याची अट पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने घातली आहे. मात्र, एसटी वेळेत उपलब्ध होत नाही. दोन-दोन महिने उशिराने एसटी उपलब्ध होत आहे. अशातच दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू करावी लागणार असल्याने सहलीचे नियोजन कोलमडू शकते. तरी नियमात शिथिलता आणावी, असे ज्ञानदीप विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत भसे यांनी सांगितले.सहलीसाठी एसटी महामंडळाच्या बसेससह अन्य शासकीय मान्यता असलेल्या आरटीओने मान्य केलेल्या वाहनांतून सहली घेऊन जाण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या पत्रकात नमूद असले तरी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाºयांनी काढलेल्या पत्रकात मात्र, केवळ परिवहन महामंडळाच्या एसटीचाच वापर करावा, असे म्हटले असल्याने प्राचार्य, मुख्याध्यापकांची धांदल उडत आहे. एसटी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. तर दुसरीकडे सहली नेण्यासाठी उशीर होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागत आहे. एसटीसाठी नोंदणी करायला गेल्यास थेट महिना, दोन महिन्यांनंतरची तारीख दिली जात आहे.अशातच फेबु्रवारी, मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने अधिकचा उशीर झाल्यास सहल आणि परीक्षा एकत्रच येऊ शकते, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळाकडे पुरेशा बस उपलब्ध नसल्याने सहलीसाठी वेळेत बस मिळत नाहीत.बससाठी पुढची तारीख दिली जाते. यामुळे सहलींनाही उशीर होतो. तसेच शाळेतील परीक्षा, जादा तास या सर्वच गोष्टींचे नियोजन कोलमडते.
जाचक अटींमुळे कोलमडतेय सहलींचे नियोजन; शाळांची उडाली धांदल, राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 4:14 AM